“श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे” ह्या कवितेचे शब्द कानावर पडताच श्रावण महिन्याची आठवण होते. अशा या मन भावन श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्याला भारतीय संस्कृतीमध्ये फार महत्त्व आहे.
श्रावण महिन्यात अनेक मराठी सणवार, व्रत – वैकल्ये केली जातात. श्रावण महिन्याला सणांचा राजा देखील म्हटले जाते. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. या सणांसोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मांसाहार न करणं. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य असतो, या महिन्यात अनेक सण, व्रत केली जातात, त्यामुळे मांसाहार केला जात नाही. पण मांसाहार न करण्याचा या परंपरेला विज्ञानाची देखील जोड आहे.
श्रावणात मांसाहार न करण्यामागची काही वैज्ञानिक कारणे आहेत, ती आपण पाहुयात…..
१. प्राण्यांचा प्रजनन काळ – श्रावणात मासे व इतर प्राण्यांची गर्भधारणा होत असते, त्यामुळे श्रावण हा काळ प्राण्यांचा प्रजनन काळ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या काळात सततच्या मासेमारीने माशांच्या प्रजाती नष्ट होऊ शकतात आणि म्हणून श्रावणात मासे व इतर मांसाहार करणे वर्ज्य असल्याचे सांगितले जाते.
२. वातावरणातील बदल – पावसाळ्यात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असतो. ऊन पावसाचा खेळ तर सुरूच असतो. मुख्यत्त्वे पावसाळ्यात वातावरणातील ओलसर व दमटपणा वाढलेला असतो आणि या वातावरणामुळे मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढीस लागतो. अशावेळेस जर आपण या मांसाचे सेवन केले तर अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधी होण्याची शक्यता वाढते.
३. पचनशक्ती मंदावते – पावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होत असतो. सतत दमट – उष्ण बदलत असलेल्या वातावरणाचा आपल्याला त्रास होत असतो. त्याचबरोबर पावसाळा ऋतूमध्ये आपली पचनशक्ती इतर दिवसांच्या तुलनेत थोडी मंदावलेली असते. त्यात मांस, मासे हे पदार्थ आपण खाल्ल्यास पचण्यासाठी ते जड असतात. त्यामुळे श्रावण आणि पावसाळ्यात देखील मांसाहार करु नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !