अल्पावधीतच झी मराठीवरील ‘लागिर झालं जी’ ही सैनिकाच्या जीवनावर आधारित मालिका प्रसिद्ध झाली होती. प्रेक्षकांना त्या मालिकेतील सर्वच पात्र फार भावली होती. आज ही त्या मालिकेतील एकूण एक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात असेलच यात काही वादच नाही.

अजिंक्य, शीतल, मामा, मामी, जयश्री, राहुल, विक्रम यांच्यासोबत अजून एक महत्त्वाचं पात्र होतं ते म्हणजे जिजी. आपल्या नातवावर जीवापाड प्रेम करणारी एक अडाणी आजी म्हणजे जिजी असं ते पात्र होतं. सत्तरी पार झालेल्या या जिजीच खरं नाव कमल गणपती ठोके.

शनिवारी आपल्या लाडक्या याच जिजींच कर्करोगाच्या आजाराने निधन झालं. त्यांच्यावर बंगळुरू येथे उपचार सुरू होते. काल १४ नोव्हेंबरला सायंकाळी त्यांचे निधन झाले. सर्वांवर माया, प्रेम करणाऱ्या या जिजी काळाच्या पडद्याआड झाल्या.

श्रीमती कमल ठोके यांनी  शिक्षकी पेशा सांभाळत आपला अभिनय जागृत ठेऊन नाटक, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीतही काम केले. सासर माहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड आम्ही असू लाडके, ना. मुख्यमंत्री गावडे अशा अनेक चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या. अल्पावधीत प्रसिद्धीचे शिखर पार करणारी झी मराठीची ‘लागिर झालं जी’ या सिरीयलमधून त्या घराघरांत ‘जिजी’ या नावाने परिचित झाल्या.

कमल ठोके यांचे सुरुवातीचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले होते. पण शिक्षणाच्या आवडीमुळे रात्रशाळेत जाऊन जुनी अकरावी पूर्ण केली आणि गणपती ठोके या शिक्षकांबरोबर विवाह झाल्यावर यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठातून एम ए पर्यंत शिक्षण घेतले. शिवाय तिथेच अध्यापनशास्त्राचेही शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिका म्हणून ३३ वर्षं नोकरी केली.

२००५ मध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते मिळाला होता. ठोकेबाईंना अगदी लहानपणापासून अभिनयाची आणि संगीताची आवड होती. पूर्वी गणेशोत्सवात मेळे व्हायचे. वयाच्या चौथ्या वर्षांपासून त्यांनी शाहीर यादव यांच्या मेळ्यात कामे केली.

संगीत कलेचे त्यांना एवढे वेड होते की, एकदा लहान असताना घरावरून कोका हे वाद्य वाजवणाऱ्या विक्रेत्याच्या मागेमागे गेल्या आणि चुकल्या. संगीताचे शास्त्रीय शिक्षण काही त्यांना घेता आले नाही पण दिलेल्या पट्टीत गायचे ही एकलव्याची साधना मात्र प्रामाणिकपणे केली. त्यातही विशेष म्हणजे ज्या काळात स्त्रिया घराबाहेर पडून कला सादर करत नसत, तेव्हा त्या बिस्मिल्ला ब्रास बँड मध्ये गायच्या. त्यानंतर त्यांनी गावोगाव भक्तीगीतांचे कार्यक्रमही केले.

‘लागिर झालं जी’ मधील ‘जिजी’ ही भूमिका अगदी त्यांच्यासाठीच बनली होती असं त्या म्हणाल्या होत्या, त्या घरी जशा त्यांच्या नातवासोबत हसत बोलत तसंच त्या सेटवर ही भूमिका साकारत, असं देखील त्या म्हणाल्या. त्यांच्या जिजी या भूमिकेसाठी त्यांना फेव्हरेट आजीचा पुरस्कार देखील मिळाला.

श्रीमती ठोके यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, मुलगी असा परिवार आहे. श्रीमती ठोके यांचे पार्थिव दि. 15 नोव्हेंबर 2020 रोजी कऱ्हाडला सकाळी 6 वाजता मंगळवार पेठ कमळेश्वर मंदिर येथील निवासस्थानी आणणात येणार आहे. अंत्यदर्शनानंतर अंत्यविधी कमळेश्वर मंदिर शेजारील स्मशानभूमीत सकाळी 10 वाजता होणार आहे.

आपल्या आयुष्यातील सर्वच भूमिका म्हणजे एक स्त्री, पत्नी, शिक्षिका, अभिनेत्री लिलया पार पाडणाऱ्या लाडक्या कमल ताई म्हणजेच जिजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *