दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते शनिवारी रात्री काळाच्या पडद्याआड गेले. अनेक हिंदी, मराठी चित्रपट व मालिकांमध्ये आपण त्यांना पाहिले आहे. शनिवारी रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले.

काही काळापासून ते हृदयासंबंधित आजाराने देखील ग्रस्त होते. या वर्षाच्या सुरुवातीला देखील त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना, मुलगी, जावई, ४ नातवंड असा परिवार आहे. सध्या झी मराठीवर सुरु असलेल्या ‘अग्गंबाई सासूबाई’ या कार्यक्रमात ते आशुतोष पत्की म्हणजेच, सोहमच्या आजोबांच्या भूमिकेत होते.

त्यांची ही भूमिका चाहत्यांच्या फार पसंतीस उतरली. लाडावलेल्या सोहमला धाकात ठेवणारे आजोबा… आणि नातवाला ‘सोम्या… कोंबडीच्या’ असं म्हणणारे ‘दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी’ या भूमिकेतील रवी पटवर्ध यांच्यावर अख्या महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलं.

६ सप्टेंबर १९३७ रोजी पटवर्धनांचा जन्म झाला होता. त्यानंतर १९७० च्या दशकात अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आपल्या दमदार अभिनयाने, आकर्षित शब्दफेक, डायलॉग बोलण्याची शैली, भारदस्त व्यक्तिमत्त्व यामुळे ते अधिक प्रसिद्ध झाले. त्यांच्या याच कौशल्यांमुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळत गेल्या. याचसोबत त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.

आरण्यक हे नाटक रवी पटवर्धन यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केलं. त्यामध्ये त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. त्यानंतर अगदी वयाच्या ८२व्या वर्षातही या नाटकात ते तीच धृतराष्ट्राची भूमिका करत होते. अनेक विविध भूमिका सादर करून अनोख्या अभिनयाची पर्वणी देणाऱ्या या अभिनेत्याला मराठी रंगभुमी, हिंदी व मराठी चित्रपट सृष्टी कायम स्मरणात ठेवेल. पटवर्धनांवर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ठाण्याचे रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्‍‌र्ह बॅंकेत नोकरी करत होते. नोकरीच्या कालावधीत बॅंकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाचा छंद जोपासता आला. ठाण्यातील राहत्या घरातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

१९७१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अशा असाव्या सुना’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. ‘सिंहासन’, ‘उंबरठा’, ‘बिनकामाचा नवरा’ ते अगदी अलीकडचा ‘हरी ओम विठ्ठला’ हे पटवर्धन यांचे चित्रपट. जवळपास १०० मराठी चित्रपटांतून त्यांनी काम केले आहे. एन. चंद्रा यांच्या ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘तेजाब’, ‘नरसिंहा’, ‘हमला’ हे आणि इतर अनेक चित्रपट केले. व्ही. शांताराम यांच्या ‘झंजार’ या चित्रपटात त्यांना एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली होती.

बॉलीरिपोर्ट टीम कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *