बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीद्वारे निर्मित चित्रपट व चित्रपटातील गाणी, कलाकार त्यांचा अभिनय यासाठी प्रसिद्ध आहेत. चित्रपटसृष्टी म्हटलं की कलाकार, अभिनय, ग्लॅमर आलंच. मग काही कलाकारांना दुय्यम वागणूक दिली जाते, तर काही कलाकार हे यशाची शिखरं गाठत पुढे जातं राहतात. मराठी चित्रपट सृष्टीतील काही कलाकार हे बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये झळकले आहेत.

परंतु त्यांना सहाय्यक अभिनेता किंवा दुय्यम दरवाजाच्या भूमिका दिल्या गेल्याचे आपल्या निदर्शनास नक्कीच आले असेल. तर याच संदर्भात मराठी चित्रपट सृष्टीतील दिगज्ज व प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला गेला, त्यावर त्यांनी बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना दुजाभाव का दिला जातो याबद्दल सांगितले.

तब्बल तीन दशके मराठी चित्रपटसृष्टी ज्यांनी गाजवली ते म्हणजे अशोक सराफ उर्फ अशोक मामा. चित्रपटांमधील त्यांची विनोदी भूमिका म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असे. सहज विनोदी प्रवृत्ती, अद्वितीय अभिनय, चेहऱ्यावरील हावभाव, अचूक वेळी विनोदाची टाचणी टाकणारे अशोक मामा त्यांच्यातील या कौशल्यांमुळे अधिक प्रसिद्ध होते. त्यांनी वेगवगेळ्या पठडीतील भूमिका म्हणजेच, विनोदी, खलनायकी व इतर भूमिका अगदी लीलया पेलल्या आहेत. त्यांचे ‘बनवाबनवी’, ‘गंमत जंमत’, ‘धुमधडाका’, ‘एक डाव भुताचा’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ असे त्यांचे कित्येक गाजलेले चित्रपट आहेत.

या व्यतिरिक्त त्यांनी बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. कुछ तुम कहो कुछ हम कहे, बेटी नं. १, करण अर्जुन, गुप्त, सिंघम, प्यार किया तो डरना क्या अशा काही हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. पण या सर्व भूमिका या दुय्यम दर्जाच्या आहेत आणि यामागीलच खरं कारण अशोक सराफ यांनी सांगितलं आहे.

या मुलाखतीदरम्यान करियरवर भाष्य करत असताना त्यांना विचारले गेले की, मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये दुजाभाव का दिला जातो? यावर त्यांनी सांगितलं, “मराठी चित्रपटसृष्टी ही अत्यंत प्रयोगशील मनोरंजनसृष्टी आहे. नाटक असो, मालिका असो की चित्रपट मराठीत पटकथांना फार महत्व दिलं जातं. इथे जणू कथाच खरी हिरो असते. अन् त्या कथेच्या अनुषंगाने कलाकारांना काम मिळतं. परंतु बॉलिवूडमध्ये तसं नाही. तिथे हिरोंना अधिक महत्व दिलं जातं.

साध्या माणसाची देखील भूमिका असली तरी देखील हिरो रुबाबदार, सुंदर असच दिसला पाहिजे हा त्यांचा अट्टाहास असतो. अर्थात ग्लॅमर हाच बॉलिवूडचा क्रेंद्रबिंदू आहे. त्यामुळं मराठीतील अनेक कलाकार त्यांच्या या व्याख्येत बसत नाहीत. कारण मराठी प्रेक्षक रंगरुप पाहून नाही तर कलाकाराचा अभिनय पाहून त्याच्यावर प्रेम करतात. त्यामुळं मराठीतील अनेक लोकप्रिय कलाकार हे सर्वसामान्यच दिसतात. अन् त्यांचं ते सामान्यत्व बॉलिवूडला नको आहे. त्यामुळं मराठी कलाकारांना नेहमीच नोकर किंवा तत्सम दुय्यम रोल दिले जातात. अर्थात नाना पाटेकर, स्मिता पाटील, अमोल पालेकर यांसारखे काही कलाकार त्याला अपवाद आहेत.” सह्याद्री वहिनीला देत असलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी बॉलिवूडमधील ही सत्यपरिस्थिती मांडली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *