या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते. आषाढ महिन्यात येणार्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते. या दिवशी रोजच्या पुजेबरोबरच श्रीविष्णूची `श्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. तसेच घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्याचीही मनोभावे पूजा केली जाते. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे.
पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, प्रत्येक जणच भगवत्स्वरूप झालेला असल्याने एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून एकमेकांप्रती आदर व्यक्त करत. पायांवर डोके ठेवण्याने अनेक लाभ होतात. दोहोंमधील चैतन्य एक होऊन दोहोंचेही तेज वाढण्यास साहाय्य होते. ‘मी’पणा, ताठा, अहंकार न्यून होतो. ‘सगळीकडे ईश्वर भरलेला आहे’, ही भावना बळावते. आपले अनुभव सांगत, नवीन रचना, अभंग, भजने, ओव्या म्हणून दाखवत. प्रसाराच्या नवीन कल्पना सांगत. इतरांना मार्गदर्शन करत. प्रत्येक जण या मेळाव्यात उपस्थित असल्याचे इतरांना समजावे, यासाठी पताका बाळगत असे. तोच प्रघात आजतागायत सुरू आहे. कार्तिकी एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याचा अन् पुढील मार्गदर्शन घेण्याचा हा दिवस असल्याने या एकादशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले, असे सांगितले जाते.
आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करुन वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो असे म्हटले जाते.
एकादशीची कथा – मृदुमान्य नावाच्या रा*क्ष*सा*ला भगवान शंकराने प्रसन्न होऊन तू कोणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील,’ असा वर दिला होता. या वरामुळे उन्मत झालेला राक्षसाने देवांवर स्वारी केली. यावेळी सर्व देव मदतीसाठी शंकराकडे धावले. मात्र शंकारांनाही काही करता येत नव्हते. यावेळी देव शंकरासह एका गुहेत जाऊन लपून बसले. यावेळी देवांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिने मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली. त्या दिवशी पाऊस पडत होता. त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले. तसेच सर्वजन गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात पडला. या देवीचे नाव होते एकादशी.
शास्त्रानुसार, जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णुसह देवी एकादशीची मनोभावे पूजा करतो ती व्यक्ती पापमुक्त होते असे म्हटले जाते. तसेच त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !