“मेरी आवाज ही पहचान है…….” आणि या ओळींप्रमाणेच खरंच ज्यांचा सुमधुर, मंत्रमुग्ध करणारा आवाज त्यांची ओळख अशा आपल्या लाडक्या लता दीदी म्हणजेच लता मंगेशकर. दैवी देण असलेल्या दीदींच्या सुरांनी अवघ्या जगाला प्रेरणा दिली. तब्बल सात दशकं संगीत सृष्टींवर अधिराज्य गाजवणारा हा आवाज ६ फेब्रुवारी रोजी गाणे अबोल करत सरस्वती मातेच्या कुशीत विसावला. वयाच्या ९२ त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी गायलेली जवळजवळ सर्वच गाणी हिट ठरली.

हिंदुस्थानी संगीत विश्वातला एक अढळ ध्रुवतारा, हिंदुस्थानच्या स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी, क्वीन ऑफ मेलोडी आणि स्वर नाइटिंगेल ऑफ इंडिया अशी अनेक विशेषणे दिली तरी कमी पडावीत, अशी त्यांची ख्याती होती. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनाच दीदींच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाल्याचे जाणवते आहे.

टीव्ही, सोशल मीडिया तर पूर्णपणे आज लता दीदींच्या या कारकिर्दी त्यांच्या गाण्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत, त्यांना आदरांजली अर्पण करत आहेत. त्यांचा चाहता वर्ग, मोठमोठे दिग्ग्ज कलाकार, बड्या पदावरील नेते सर्वच त्यांच्या जाण्याने भावुक झाले आहेत. अनेक नेत्यांनी देखील लता दीदीं सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेयर करत ‘स्वर आज हरपले’, ‘कधीही भरून न निघणारी पोकळी’ असे कॅप्शन देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अनेक गाणी अजरामर केलेल्या लता दीदींनी लहानपणापासूनच गायनाला सुरुवात केली. लतापासून जगातील सुप्रसिद्ध गायिका हा किताब मिळेपर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर होता. त्यांना पहिली कमाई म्हणून पंचवीस रुपये मिळाले होते. कष्ट करत, संघर्ष करत त्या आपले कामं करत राहिल्या. साक्षात सरस्वतीचा वरदहस्त असणाऱ्या लता दीदींना नवी ओळख मिळाली आणि एकामागोमाग एक जबरदस्त गाणी गात आपल्या आवाजाची जादू सर्वत्र पेरली. अवघ्या २५ रुपयांनी सुरु झालेला हा प्रवास आज भल्या मोठ्या संपत्तीत रूपांतरित झाला आहे. ही संपत्ती म्हणजे त्यांच्या कष्टाची, रियाजाची पोचपावती म्हणता येईल.

रिपब्लिकवर्ड.कॉम या वेबसाईटवर २८ सप्टेंबर २०२० रोजी देण्यात आलेल्या एका बातमीनुसार, लता दीदींची संपूर्ण संपत्ती अमेरिकन डॉलरप्रमाणे ५० मिलियन डॉलर इतकी आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये पाहायला गेलं तर कोटींच्या घरात ही संपत्ती आहे. त्या मुंबईतील आलिशान समजल्या जाणाऱ्या भागात वास्तव्यास होत्या. दीदी पेडर रोडवरील प्रतिष्ठित अशा प्रभुकुंजमध्ये राहत होत्या. कायम साध्या राहणाऱ्या लता दीदींना एकाच गोष्टीची अधिक आवड होती. त्यांना वेगवेगळ्या कार खूप आवडत असतं.

त्यामुळे त्यांच्याकडे शेवर्लेट, ब्विक आणि क्रिसलर या व अशा जबरदस्त ब्रँडच्या महागड्या कार आहेत. एक विशेष गोष्ट म्हणजे लता मंगेशकर यांना दिग्दर्शक यश चोप्रा यांनी गिफ्ट म्हणून महागडी मर्सिडीज दिली होती. वीर झारा या सिनेमासाठी त्यांनी गायलेल्या गाण्यामुळे खूश होत यश चोप्रा यांनी लता मंगेशकर यांना महागडी मर्सिडीज गिफ्ट केली होती.

पुलंचे शब्द आज इथे आठवतात, “आकाशात देव आहे का मला ठाऊक नाही. आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे.” लता दीदींना भावपूर्ण आदरांजली………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *